संजय राऊत–अनिल परब यांची शिवतीर्थवर भेट; “युतीचा निर्णय लवकरच जाहीर होणार”
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल सोमवारी वाजला असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांसाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील भेटी वाढल्या असून आता दोन्ही पक्षांतील नेतेही परस्पर संवाद साधू लागले आहेत. याच क्रमात मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर युतीबाबत महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मनसे–ठाकरे गट युतीबाबत सध्या सविस्तर चर्चा सुरू आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा अंतिम टप्प्यात असून युतीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. हा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मनसेबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, एका व्यक्तीच्या मतावर नव्हे तर अनेक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. सध्या शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीचा भाग आहे आणि मविआ एकत्र राहावी, हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“इच्छा, अपेक्षा आणि चर्चा यामध्ये फरक असतो. अंतिम चर्चा पूर्ण होऊन जेव्हा निर्णय होईल, तेव्हा तो अधिकृतपणे जाहीर केला जाईल,” असं सांगत अनिल परब यांनी मनसे–ठाकरे गट युतीबाबतचा निर्णय लवकरच समोर येईल, असे संकेत दिले आहेत.




