व्यावसायिक निष्ठा की मोठे नुकसान? सुपरस्टारने आदित्य धरची ऑफर नाकारण्यामागचं सत्य सांगितलं
बॉलीवूडचा ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूर सध्या त्याच्या एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २: द रिवेंज’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात अनिल कपूर दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व अफवांना पूर्णविराम देत खुद्द अनिल कपूरनेच या चित्रपटात काम न करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, आदित्य धर यांनी त्यांना एका महत्त्वाच्या ‘कॅमिओ’साठी विचारले होते, पण त्यांनी ही ऑफर नाकारली.
कमिटमेंटमुळे नाकारली मोठी संधी
अनिल कपूर यांनी या निर्णयामागे आपली व्यावसायिक निष्ठा (Professionalism) असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी आज ज्या स्थानावर आहे, ते केवळ माझ्या शब्दाला जागतो म्हणून आहे. आदित्य धर जेव्हा माझ्याकडे ही ऑफर घेऊन आले, तेव्हा त्याच तारखा मी आधीच दुसऱ्या एका चित्रपट निर्मात्याला दिल्या होत्या. एका निर्मात्याचा शब्द मोडून दुसऱ्याकडे जाणे मला अनप्रोफेशनल वाटले असते. हा चित्रपट भव्य आहे आणि तो न करणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे याची मला जाणीव आहे, पण मी माझ्या कमिटमेंटशी तडजोड करू शकत नाही.”
‘धुरंधर २’ कडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या अपेक्षा
दरम्यान, ‘धुरंधर २’ बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तब्बल ३ तास ५५ मिनिटांचा असून बॉलीवूडमधील हा सर्वात मोठा चित्रपट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या भागाने १३५० कोटींचा गल्ला जमवल्यानंतर, आता १९ मार्चला प्रदर्शित होणारा हा सिक्वेल काय विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




