spot_img

Anganewadi Jatra 2026 : कोकणातील प्रतिपंढरपूर आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा उद्यापासून सुरू”

spot_img

देवीच्या कौलावर ठरणारी दीड दिवसांची जत्रा; लाखो भाविक, नवस-गाऱ्हाणे आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आकर्षण

कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील आई भराडी देवीची वार्षिक यात्रा उद्यापासून, म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी या वाडीत भरवली जाणारी ही यात्रा दीड दिवस चालते. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.

या यात्रेचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे तिची तारीख कोणत्याही पंचांगातील तिथीनुसार ठरत नाही. देवीचा कौल घेतल्यानंतरच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो. त्यामुळे ही जत्रा पारंपरिक सणांपेक्षा वेगळी आणि भाविकांसाठी अधिक श्रद्धेची मानली जाते. यंदा नव्या वर्षात ही यात्रा 9 फेब्रुवारीपासून होणार असून, या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

भरडावर देवी प्रकट झाली, अशी लोकश्रद्धा असल्याने तिला ‘भराडी देवी’ असे नाव पडले. भरड म्हणजे माळरान आणि आंगणेवाडी परिसर माळरानी भागात असल्यामुळे देवीचे हे नाव प्रचलित झाले. याच पवित्र स्थळी भराडी देवीचे मंदिर असून, येथेच दरवर्षी ही यात्रा भरते.

आंगणेवाडीतील भराडी देवी ही मूळतः आंगणे कुटुंबियांची कुलदेवता मानली जाते. मंदिरावर खाजगी मंदिर असा उल्लेख असला, तरी देवी नवसाला पावते या श्रद्धेमुळे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले असते. गाऱ्हाणे घालणे, नवस बोलणे आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भाविक देवीचरणी नतमस्तक होतात. अवघ्या दीड दिवसांच्या यात्रेत दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेचा नैवेद्यही खास परंपरेचा असतो. आंगणे कुटुंबातील माहेरवाशिणी स्त्रिया अबोल राहून हा नैवेद्य तयार करतात, ही परंपरा आजही जपली जाते.

धार्मिक महत्त्वासोबतच या यात्रेला सांस्कृतिक बाजूही आहे. आंगणे ग्रामस्थांकडून ‘मांडावरचं नाटक’ सादर केलं जातं. मिरजेहून आलेले गोंधळी देवीसमोर गोंधळ मांडतात, तर दशावतार नाट्यप्रयोग भाविकांचे विशेष आकर्षण ठरतात. अनेक राजकीय नेते आणि मान्यवरही या यात्रेदरम्यान भराडी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ