महानायकांना स्टाफकडून उधार घ्यावं लागलं, पण यश चोप्रांच्या ‘मोहब्बतें’ने बदललं संपूर्ण आयुष्य
एक छोटं चांगलं पाऊल तुमचं नशिब बदलून टाकू शकतं हे वाक्य महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं. कधी इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेता असलेले बिग बी एकेकाळी इतक्या आर्थिक अडचणीत सापडले होते की, त्यांना स्वतःच्या स्टाफकडून पैसे उधार घ्यावे लागत होते.
१९९० साली अमिताभ बच्चन यांच्या ‘एबीसीएल’ या कंपनीचा दिवाळा निघाला आणि त्यांच्यावर ९० लाख रुपयांचं कर्ज चढलं. स्वतः अमिताभ यांनी सांगितलं होतं की, “माझ्याविरोधात ५५ कायदेशीर खटले सुरू होते आणि रोज कर्जदार दारात उभे असायचे.” त्यांच्याशी काम करण्यासाठी एकेकाळी रांगा लावणारे लोक अचानक दुरावले ही वेळ बिग बींसाठी अत्यंत अपमानास्पद होती.
अशा या कठीण टप्प्यात त्यांना आधार दिला दिग्दर्शक यश चोप्रा यांनी. त्यांनी ‘मोहब्बतें’ सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना संधी दिली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि तब्बल ४१ कोटी रुपयांची कमाई करून गेला. या यशामुळे अमिताभ बच्चन यांचं आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात कमी झालं.
या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. ऐश्वर्याची ‘मेघा’ ही लहान पण प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ‘मोहब्बतें’च्या (mohabbatein) अफाट यशामुळे फक्त निर्मातेच नव्हे तर बिग बींचं नशिबही पुन्हा उजळलं आणि एका अडचणीच्या पर्वानंतर सुरू झाला त्यांच्या नव्या यशाचा अध्याय.




