अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी नाट्यप्रयोगादरम्यान मोठा गोंधळ उडाला. लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या ‘दमयंती दामले’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना मध्यंतरानंतर पडदा उघडत नसल्याने सुमारे अर्धा तास प्रयोग थांबवावा लागला. त्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला.
मध्यंतरानंतर कलाकार रंगमंचावर परतण्यास सज्ज होते, मात्र पडदा उघडण्यासाठीची यंत्रणा अचानक बंद पडली. धक्कादायक बाब म्हणजे त्या वेळी नाट्यगृहात एकही टेक्निशियन उपस्थित नव्हता. परिणामी कलाकारांनीच पुढाकार घेत हाताने पडदा उघडला आणि त्यानंतर नाटक पुन्हा सुरू करण्यात आले.
याआधी देखील नाटक सुरू असताना साउंड सिस्टीममध्ये बिघाड झाला होता. मात्र साउंड टीमने तत्काळ दुरुस्ती करत प्रयोग सुरू ठेवला. तरीही पडद्याच्या बिघाडामुळे संपूर्ण आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
नाटक संपल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. अखेरीस अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतः पडदा हाताने बंद केला. या प्रकारामुळे प्रेक्षक आणि आयोजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. आयोजक आप्पा कुलकर्णी यांनीही संताप व्यक्त करत, इतक्या मोठ्या नाट्यगृहात मूलभूत सुविधा आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव असणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.
या घटनेमुळे अंबरनाथ पालिकेच्या व्यवस्थापनावर टीका होत असून, कलाकार आणि शेकडो प्रेक्षकांसमोर प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाटक संपल्यानंतर उशिरा आलेल्या टेक्निशियनने पडद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.




