अमेडिया कंपनी, पार्थ पवार यांच्यावरील कारवाई आणि चौकशीतील विलंबावर विरोधकांचा जोरदार हल्ला
पुण्यातील मुंढवा आणि कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लँड माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप अधिक तीव्र झाले आहेत. विशेष म्हणजे मुंढवा जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीचे नाव समोर आले आहे.
शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि इतर सहआरोपींवर कारवाई झाली असताना, ९९ टक्के भागधारक पार्थ पवार यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई न झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. हा व्यवहार रद्द झाला असला तरी मुद्रांक शुल्क म्हणून ४२ कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम भरण्यासाठी सतत मुदतवाढ दिली जात असल्याने विरोधक संतप्त आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी X वरून सरकारला चार थेट प्रश्न विचारले आहेत.
अंबादास दानवे यांनी सरकारला विचारलेले चार सवाल :
1) जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल, तर जमीन घेणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
2) अमेडिया कंपनीला उत्तर देण्यासाठी अजून किती ‘मुदतवाढ’ देणार?
3) अमेडियात फक्त १% भागधारक असलेला दिग्विजय पाटील, ९९% भागधारक पार्थ पवार यांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी कसा झाला?
4) मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
दानवे म्हणाले की, ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय अशक्य आहे. अजित पवार यांना याची माहिती नव्हती असे बोलणे म्हणजे जनतेला वेडे समजण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टिका केली.




