नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणांचा खजिना; महागड्या सौंदर्य प्रसाधनांपेक्षा तुरटीचा ‘हा’ वापर आहे अधिक प्रभावी
भारतीय घरांमध्ये तुरटीचा (Alum) वापर पिढ्यानपिढ्या होत आला आहे. कधी दुखापतीतून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, तर कधी पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी तुरटी वापरली जाते. मात्र, उन्हाळ्याच्या रखरखीत दिवसात त्वचेच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्यांवर तुरटी हा एक स्वस्त आणि नैसर्गिक ‘रामबाण’ उपाय ठरू शकतो. तुरटीमध्ये नैसर्गिकरीत्या जंतुनाशक आणि थंड करण्याचे गुणधर्म असतात, जे संसर्गापासून संरक्षण करतात. उन्हाळ्यात अनेकांना घामाच्या उग्र वासामुळे लोकांमध्ये वावरताना संकोच वाटतो. हा वास बॅक्टेरियांमुळे येत असतो. अशा वेळी तुरटी थोडी ओले करून काखेत चोळल्यास घामाची दुर्गंधी समूळ नष्ट होते.
उन्हाळ्यातील दमट हवामानामुळे अंगाला खाज सुटणे किंवा पुरळ येणे ही सामान्य समस्या आहे. यावर उपाय म्हणून आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटीची पावडर मिसळल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि फंगल इन्फेक्शनचा धोका टळतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि उन्हात चेहरा चिकट होत असेल, तर १ कप पाण्यात तुरटी मिसळून तयार केलेले ‘नैसर्गिक टोनर’ चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते. तसेच, उन्हाळ्यात होणाऱ्या मुरुमांच्या (Pimples) त्रासासाठी चिमूटभर तुरटी पावडर दह्यात मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचा उजळते.
केवळ त्वचाच नव्हे, तर तोंडाचे आरोग्य जपण्यासाठीही तुरटी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. अशा वेळी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास मुखदुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांचे आरोग्यही सुधारते. मात्र, तुरटी वापरताना एक खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुरटीचा अतिवापर त्वचेला कोरडे करू शकतो, त्यामुळे तिचा वापर मर्यादित स्वरूपातच करावा. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा पॅच टेस्ट केल्यानंतरच याचा वापर करणे हिताचे ठरेल. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या या ‘मॅजिकल’ खनिजाचा योग्य वापर केल्यास उन्हाळा अधिक सुसह्य आणि आरोग्यदायी होऊ शकतो.




