आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले असले तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड थांबायचं नाव घेत नाहीये. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून सोशल मीडियावरही ‘धुरंधर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ प्रेक्षकच नाही, तर अनेक नामवंत सेलिब्रिटीही या चित्रपटाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं मनापासून कौतुक करत आहेत.
रणवीर सिंग (Ranveer Singh), अक्षय खन्ना (Akshaye Khanna), अर्जुन रामपाल (Arjun Rampal), आर. माधवन (R. Madhvan), संजय दत्त (Sanjay Dutta), राकेश बेदी (Rakesh Bedi) आणि बालकलाकार सारा अर्जुन (Sara Arjun) यांच्या भूमिका विशेष गाजत आहेत. मात्र रेहमान डकैतच्या भूमिकेत झळकलेला अक्षय खन्ना सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. त्याच्या दमदार अभिनयाचं कौतुक इतकं वाढलं आहे की काही दिवसांपूर्वी कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान हिनेसुद्धा अक्षय खन्नाला थेट ‘ऑस्कर द्यावा’ अशी मागणी केली होती.
दरम्यान, ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा डान्स आणि परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी त्याचा जुना चित्रपट ‘तीस मार खां’ पुन्हा पाहायला सुरुवात केली आहे. त्या चित्रपटातील ऑस्करची गंमतीशीर क्लिप आता नव्याने चर्चेत आली आहे.
याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि भाजप नेत्या, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी ‘तीस मार खां’मधील ती क्लिप त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत अक्षय खन्नाचं कौतुक केलं. “जेव्हा अक्षय खन्ना आपल्या अभिनयाने सगळ्या अपेक्षा ओलांडतो, तेव्हा आपसूकच म्हणावंसं वाटतं – दे दो ऑस्कर,” असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
स्मृती इराणी यांच्यापाठोपाठ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samanath Ruth Prabhu) हिनेही ‘धुरंधर’चं भरभरून कौतुक केलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतरचा अनुभव शेअर करत समंथाने लिहिलं, “धुरंधर पाहून अजूनही एक्सायटेड आहे. मोठ्या पडद्यावरचा थरार जबरदस्त आहे. आदित्य धरचं मनापासून अभिनंदन. अक्षय खन्नाचा अप्रतिम परफॉर्मन्स, अर्जुन रामपालचं काम अंगावर काटा आणणारं आहे. आर. माधवन नेहमीप्रमाणे सरप्राईज देतो आणि संजय दत्तने तर स्क्रीन पेटवली आहे.”
या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षक ‘धुरंधर 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे हा सिक्वेल 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.




