अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी नंबर लावण्यासाठी उभे होते. याच वेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर परिसरात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून नागरिकांनी व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी “गॅस बुक केल्यावर २५ दिवसांत सिलिंडर मिळतो” असे विधान करणाऱ्या आमदारांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, अशा परिस्थितीत संबंधित कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यात गॅस सिलिंडर मुबलक असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या घटनेचा दाखला देत वास्तव परिस्थिती समोर आणली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी अशी मागणी जोर धरत आहे.




