महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना निलेशचंद्र मूनी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ताराराणी जैन नव्हत्या आणि इतिहासाचा विपर्यास करणे चुकीचे आहे. तसेच आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
निलेशचंद्र यांनी आरोप केला की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात वाद निर्माण होतात. विशेषतः मराठा आणि मारवाडी समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय, मंगलप्रभात लोढा यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधत या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात मतभेद वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महावीर जयंतीच्या निमित्ताने अशा प्रकारचा इतिहासाचा संदर्भ देण्याची गरज काय होती, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी संबंधितांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही आवाहन केले.




