राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अचानक निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोण स्वीकारणार, याबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले होते. या चर्चांमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर होते.
गुरुवारी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, शनिवारी राजभवनातील लोक भवन येथे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याने समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या निर्णयावर टीका केली, तर काहींनी त्याला धैर्याचं पाऊल असल्याचं म्हटलं.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हिने आपली भूमिका स्पष्ट केली. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्यक्त होताना ती म्हणाली की, शपथ घेणं म्हणजे दुःख झटकून टाकणं नव्हे, तर काही वेळा जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखाला दिलेलं उत्तर असतं. प्रत्येक व्यक्ती दुःखाला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरी जाते, आणि दोन्ही प्रतिक्रिया मानवीच आहेत, असंही तिने नमूद केलं.
अंकिताने पुढे सांगितलं की, सोशल मीडियावर टीका करणं सहज शक्य असतं, मात्र समोरची व्यक्ती कोणत्या मानसिक अवस्थेतून जात आहे, हे कुणालाच ठाऊक नसतं. राजकारणात मतभेद आणि प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक असलं, तरी वैयक्तिक दुःखावर प्रहार करणं समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं, असं मत तिने मांडलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.




