spot_img

Ajit Pawar: महापालिका रणधुमाळीत ‘दादा गट’ स्वबळावर? महायुतीपासून वेगळा मार्ग निवडण्याचे संकेत

spot_img

भाजप–शिंदेसेनेशी जागावाटप न जुळल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांत स्वतंत्र लढतीच्या तयारीत

राज्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि धक्कादायक घडामोड समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (दादा गट) अनेक ठिकाणी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. भाजप आणि शिंदेसेनेसोबत अपेक्षित जागावाटप न झाल्याने तसेच नैसर्गिक युतीचा अभाव असल्याने हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे.

मुंबई (Mumbai), ठाणे (Thanee), कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali), वसई-विरार (Vasai Virar), मिरा-भाईंदर (Mira Bhyander), पुणे–पिंपरी चिंचवड (Pune Pimpari Chinchwad), नाशिक (Nashik), सोलापूर (Solpaur) आणि अमरावती अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र मैदानात उतरणार असल्याने राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळण्याची चिन्हे नसल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, महायुतीमध्ये असतानाही अनेक ठिकाणी थेट सामना पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये अजित पवार गटाने उल्लेखनीय कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली आहे. विशेषतः मराठवाड्यात शिंदेसेनेचा प्रभाव असतानाही राष्ट्रवादीने चांगली आघाडी घेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. या यशामुळे महापालिकांमध्येही स्थानिक नेत्यांकडून स्वतंत्र लढतीचा आग्रह वाढताना दिसतो आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील चर्चेनंतरच स्वबळाचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची याबाबत लवचिक भूमिका ठेवण्याचे संकेत आहेत. काँग्रेसला वगळून समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा सल्ला भाजपकडून दिला जात असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, काही महापालिकांमध्ये परिस्थितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार आणि शरद पवार गट) एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण अधिक रंगतदार आणि चुरशीचे होणार, हे मात्र निश्चित आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ