नेतृत्व हरपल्याची सल, कार्यकर्त्यांचा आक्रोश, गावकऱ्यांच्या आठवणींनी भारावलेलं वातावरण
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. कालपासून राज्यभरात शोककळा पसरली असून अनेकांना “आपलं छत्र हरपलं” अशी भावना सतावत आहे. कार्यकर्ते, नेते, सामान्य नागरिक सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू आहेत. अनेकांसाठी हे केवळ एका नेत्याचं निधन नसून, आधार देणारं नेतृत्वच निघून गेल्याची वेदना आहे.
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत प्रचंड जनसागर उसळला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मिळेल त्या वाहनाने, जमेल त्या साधनांनी इथे दाखल झाले. काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काटेवाडीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. “अजितदादा अमर रहे”, “दादा परत या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वातावरण इतकं भावूक होतं की अनेकांचा कंठ दाटून येत होता, तर काहींना शब्दही फुटत नव्हते.
लोक दादांच्या आठवणी सांगत होते. कुणाच्या गावात रस्ता झाला, कुणाच्या भागात पाणी पोहोचलं, कुणाच्या आयुष्यात एखाद्या निर्णयामुळे बदल झाला – प्रत्येकाकडे दादांच्या कार्याची एखादी गोष्ट होती. दादांनी दिलेला शब्द म्हणजे काम पूर्ण होण्याची खात्री, ही भावना अनेकांनी व्यक्त केली. काम होणार नसेल तर स्पष्ट ‘नाही’ सांगणारा त्यांचा थेट स्वभावही लोकांना आपलासा वाटायचा.
६५ वर्षीय गणपत ठोंबरे यांचे डोळे पाणावले होते. “२४ तास उलटून गेले तरी दादा आपल्यातून गेलेत हे मनाला पटत नाही. एवढ्या मोठ्या पदांवर राहूनही त्यांनी गावकऱ्यांना कधी विसरलं नाही,” असं सांगताना त्यांचा हुंदका आवरत नव्हता. तर धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील चंद्रकांत माळी म्हणाले, “राज्याने आज हिरा गमावला आहे. असा नेता वारंवार जन्माला येत नाही.”
रस्ते, पूल, सिंचन योजना, ग्रामीण विकास याबाबत दादांचा दूरदृष्टीकोन आजही लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. काटेवाडीतला हा अखेरचा निरोप केवळ अंत्ययात्रा नव्हती, तर एका युगाला दिलेला भावनिक निरोप होता.




