प्रशांत जगताप यांचा शरद पवारांना पत्राद्वारे विरोध; “पुण्यात महायुतीविरोधी नाराजी, अशा वेळी युती चुकीची
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक वातावरणाने उधाण आणले आहे. काही नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका दोन डिसेंबरला पूर्ण झाल्या, तर काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलून आता 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता गडद होत आहे.
याच दरम्यान पुणे महापालिकेबाबत एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते अंकुश काकडे यांना संपर्क साधून पुणे महापालिका निवडणुकीसाठी युतीची चर्चा पुढे नेल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांना एक पत्र लिहून महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. जगताप यांनी म्हटले की अजित पवारांनी काकडेंकडे युतीबाबत चौकशी करताना, “या युतीला प्रशांत जगताप विरोध का करत आहेत?” असा सवालही उपस्थित केला. नंतर काकडेंनीही जगतापांना फोन करून हा मुद्दा उपस्थित केल्याचे ते सांगतात.
जगताप यांनी पत्रात युतीला स्पष्ट विरोध दर्शवत लिहिले आहे की, पुणेकरांमध्ये महायुतीबद्दल मोठा असंतोष आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करणे पुण्यात चुकीचा संदेश देणारे ठरेल. पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यासाठी मी या युतीला विरोध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.




