अहिल्यानगरातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sanggram Jagtap) यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जगताप यांनी नुकतेच दिवाळीच्या खरेदीसंदर्भात केवळ हिंदू दुकानदारांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वक्तव्याने पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणाला धक्का बसत असल्याचे सांगत अजित पवार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.अजित पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले, “जोपर्यंत अरुणकाका जगताप हयात होते, तोपर्यंत अहिल्यानगरात सर्व काही व्यवस्थित होते. पण आता संग्राम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. हा महाराष्ट्र शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर यांचा आहे, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो.
मी यापूर्वी संग्राम यांना समजावले होते, त्यांनी सुधारणा करू असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वक्तव्यांत कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे त्यांची ही भूमिका पक्षाला मान्य नाही. त्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल.”अहिल्यानगरात गेल्या काही काळापासून धार्मिक तणाव वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगजेब फॅन क्लबच्या मुद्द्याने शहरात खळबळ उडाली होती, त्यानंतर हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण झाला. अलीकडेच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली. करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पेटला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे अहिल्यानगरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. जगताप यांना आता पक्षाकडून पाठवण्यात येणाऱ्या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार असून, याप्रकरणी पक्ष कोणता पुढील निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




