अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदाची ही दुसरी टर्म असणार आहे.
मुंबकरांचे क्रिकेटवर असलेले प्रेम जगजाहीर आहे. MCA च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी येत्या 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, पण त्याआधीच अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association – MCA) चा भावी अध्यक्ष निश्चित झाला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पडद्यामागे वेगाने हालचाली झाल्या आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपले अर्ज मागे घेतले. या नाट्यमय घडामोडींमुळे MCA च्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी डायना एडलजी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, नवीन शेट्टी, प्रसाद लाड, राजदीपकुमार गुप्ता, शहाआलम शेख, सूरज सामंत, विहंग सरनाईक यांनी अर्ज केले होते. त्यापैकी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांनी अर्ज कायम ठेवले. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांच्यात लढत होईल.अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतला. शाह आलम शेख यांनी सेक्रेटरी पदाचा अर्ज ठेवला आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज अजिंक्य नाईक यांना भरता येणार नाही असं त्यांच म्हणणं होतं.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी असताना अमोल काळे यांचं निधन झाल्यानं अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. अजिंक्य नाईक आता पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. अजिंक्य नाईक 23 जुलै 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. नाईक यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यावेळी अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता. अजिंक्य नाईक यांचं शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालं. त्यांनी पदवीचं शिक्षण रुपारेल कॉलेजमधून घेतलं. तर, मुंबई विद्यापीठातून एमबीए पूर्ण केलं.
अजिंक्य नाईक याची मंबई क्रिकेट असोसिएशनमधील कारकीर्द –
2022- 2024- सचिव
2019 -2022 – कार्यकारिणी सदस्य
2024- 2025- मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष
अजिंक्य नाईक यांनी अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळाली असं सांगितलं. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.MCA हे एक कुटुंब आहे. भांडण होतं असतात निवडणुका होतं असतात आम्ही सर्व मिळून काम करू असं अजिंक्य नाईक म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वानखेडे स्टेडियम बाबत सुतोवाच केले होते. त्यानुसार नक्कीच आम्ही करू असं अजिंक्य नाईक म्हणाले.




