spot_img

Air India plane crash : पायलटनेच घडवला अहमदाबाद विमान अपघात?

spot_img

गेल्या वर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या दुर्घटनेत 260 निरपराध प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. सुरुवातीला हा अपघात एका तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक अतिशय धक्कादायक वळण मिळाले आहे. एका प्रसिद्ध इटालियन वृत्तपत्राने केलेल्या दाव्याने भारतात खळबळ माजली आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर पायलटच्या एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे, म्हणजेच ‘घातपातामुळे’ झाला असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील तो काळा दिवस कोणीही विसरू शकत नाही. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटे हवेत असताना विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच भीषण आगीच्या गोळ्याने जमिनीला स्पर्श केला. या विमानात 260 प्रवासी होते, ज्यात महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. अपघातानंतर लगेचच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि इतर तपास यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ हस्तगत करण्यात आला. सुरुवातीच्या प्राथमिक अहवालात इंजिनमधील बिघाड यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. संपूर्ण देश मृतांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी होता आणि सर्वांनाच एका प्रश्नाचे उत्तर हवे होते – हा अपघात नक्की झाला कसा?

इटलीतील प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘कोरीएर डेला सेरा’ने (Corriere della Sera’) नुकताच एक खळबळजनक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील दोन महत्त्वाच्या सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, हा अपघात कोणताही तांत्रिक दोष किंवा हवामानातील बदलामुळे झालेला नाही. तर, वैमानिकाने जाणीवपूर्वक विमान क्रॅश केले असण्याची शक्यता या अहवालात सांगण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणा अशा प्रकारचा एक सविस्तर अहवाल तयार करत आहेत, ज्यामध्ये पायलटच्या मानसिक स्थितीवर आणि त्याच्या शेवटच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहे. सूत्रांच्या मते, ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून काही असे संकेत मिळाले आहेत, जे पायलटच्या संशयास्पद कृतीकडे बोट दाखवतात, असे देखील इटालियन वृत्तपत्रात म्हटले आहे.

हे वृत्तपत्र दावा करत आहे की, त्यांच्याकडे ही माहिती वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीतील दोन अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून आली आहे. विमानाची निर्मिती ज्या देशात झाली किंवा ज्यांच्याकडे तांत्रिक तपासाचे प्रगत तंत्रज्ञान आहे, अशा आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी भारतीय तपास पथके संपर्कात आहेत. जर हा दावा खरा असेल, तर हा ‘पायलट सुसाईड’ किंवा ‘मास मर्डर’ चा प्रकार असू शकतो, ज्याने जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

इटालियन (Italian) वृत्तपत्राच्या या दाव्याचे पडसाद भारतात तीव्रतेने उमटायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर यावर चर्चा सुरू झाली असून, मृतांच्या नातेवाईकांनी पुन्हा एकदा निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. भारतीय विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अधिकृत अहवाल प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा आंतरराष्ट्रीय बातम्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र, जर परदेशी मीडियात अशा बातम्या येत असतील, तर तपास यंत्रणांवर दबाव वाढणे स्वाभाविक आहे, अशी अनेक मतं तज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत.

आता प्रश्न पडतो की, एखादा पायलट असे का करेल? इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत, जिथे पायलटच्या वैयक्तिक आयुष्यातील तणाव किंवा मानसिक आजारामुळे त्यांनी विमानाचा अपघात घडवून आणला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला तांत्रिक दोषाची शक्यताही पूर्णपणे नाकारता येत नाही. विमानाचे इंजिन अचानक बंद पडणे, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम हॅक होणे किंवा सॉफ्टवेअरमधील त्रुटी यांमुळेही विमान नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. भारतीय तपास यंत्रणा सध्या या दोन्ही बाजूंनी चौकशी करत आहेत. इटालियन रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तपास यंत्रणा खरोखरच पायलटला दोषी धरत आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अहमदाबाद विमान अपघात ही केवळ एक तांत्रिक दुर्घटना नसून ती 260 कुटुंबांची वाताहत करणारी शोकांतिका आहे. इटालियन वृत्तपत्राने केलेला दावा अत्यंत गंभीर आहे. जर पायलटचा यात जाणीवपूर्वक हात असेल, तर हे विमान सुरक्षिततेच्या नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. मात्र हा अपघात खरोखरच तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा की यामागे काही वेगळेच कारस्थान आहे?

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ