बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निर्णयाने सरोदेंना मोठा धक्का
वकील असीम सरोदे यांच्या वकिलीच्या सनदेचे तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिलेले आहेत.या निर्णयामागचं कारण म्हणजे असीम सरोदे यांनी मुंबईतील (Mumbai) वरळी परिसरात आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेले वादग्रस्त वक्तव्य. एका सार्वजनिक कार्यक्रमात सरोदेंनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली होती. या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि लोकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास पसरला, अशी तक्रार बार कौन्सिलकडे दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने 19 मार्च 2024 रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. परिणामी, बार कौन्सिलने त्यांच्यावर तीन महिन्यांची निलंबनाची कारवाई केली.
याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात 19 मार्च 2024 रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप पाहिल्या. व्हिडिओमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की, “राज्यपाल फालतू आहेत” व “न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे”. अशा विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था आणि संविधानिक पदे यांचा आदर राखणे ही वकिलाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. वकील हा “Officer of the Court” असल्याने त्याने न्यायसंस्थेविषयी संयम आणि सन्मान राखला पाहिजे, असे बार कौन्सिलच्या समितीने म्हटले.
या प्रकरणात आता वकील असीम सरोदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.ते म्हणाले की “मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदांचा अपमान केलेला नाही. माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. “फालतू” हा शब्द मी अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता”




