महाराष्ट्राची पुरोगामी ओळख लक्षात घेता अशोक खरात प्रकरण अत्यंत निंदनीय असून त्याला कोणत्याही स्तरावर समर्थन मिळालेले नाही, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या घटनेतून समाजाने विशेषतः भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली अंधश्रद्धेकडे झुकणाऱ्या प्रवृत्तींबाबत सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खरात याच्यासोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले असले तरी त्यातून कोणताही पाठिंबा असल्याचा अर्थ होत नाही, असे तटकरे यांनी सांगितले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली भेट म्हणजे समर्थन नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या विविध व्यक्तींवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, काही जण एकमेकांची नावे घेत बदनामी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा गोष्टी टाळून महाराष्ट्राची विचारधारा जपणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यासोबतच, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.




