अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी रविवारी स्वतःला इजा करून घेतल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.
मात्र आता त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर हर्षवर्धन तनवर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महाराजांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच उपचारासाठी ठेवले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
डॉक्टरांनी भक्तांना विनंती केली आहे की, महाराजांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करू नये. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळता येईल आणि त्यांना लवकर बरे होण्यास मदत होईल.
दरम्यान, रुग्णालयातूनच आदिनाथ महाराज शास्त्री यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, त्यांची तब्येत आता स्थिर आहे आणि ते लवकरच पुन्हा गडावर परततील. मात्र त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. तसेच कोणीही रुग्णालयात भेटायला येऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास महाराज भक्तांसोबत होते. त्यानंतर ते आपल्या खोलीत गेले आणि तेथे त्यांनी स्वतःच्या अंगावर वार करून घेतले. काही वेळाने खोलीत गेलेल्या व्यक्तींना ते जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना पाथर्डी तालुका तसेच बीड जिल्ह्यात मोठा भक्तवर्ग आहे. त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.




