भारतातील बिझनेस वातावरणावरही व्यक्त केलं मत
2000 च्या दशकातील गाजलेल्या कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिमी सेन आता पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात झेप घेताना दिसत आहे. ‘फिर हेरा फेरी’, ‘हंगामा’, ‘धूम’, ‘जॉनी गद्दार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून लोकप्रिय झालेली रिमी सेन सध्या अभिनयापासून दूर असून तिने दुबईत रिअल इस्टेट व्यवसायात सक्रिय प्रवेश केला आहे.
‘बिल्डकॅप्स रिअल इस्टेट एलएलसी’ला दिलेल्या मुलाखतीत रिमीने दुबईत रिअल इस्टेट एजंट बनण्यामागील कारण स्पष्ट केलं. भारताच्या तुलनेत दुबईमध्ये बिझनेससाठी अधिक अनुकूल वातावरण असल्याचं मत तिने मांडलं. दुबई शहराची शिस्तबद्ध कार्यपद्धती, नियोजनबद्ध रिअल इस्टेट सिस्टीम आणि परदेशी नागरिकांना मिळणारी संधी यामुळे हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं.
रिमी सेनच्या मते, दुबईत विविध धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीयतेतील लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथे नागरिकांच्या जीवनशैलीला अधिक आरामदायी बनवण्यावर भर दिला जातो. याउलट भारतात वारंवार बदलणाऱ्या धोरणांमुळे आणि वाढत्या टॅक्स प्रणालीमुळे व्यावसायिक अडचणी वाढत असल्याचं तिने स्पष्ट केलं.
दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या तिच्या बदललेल्या लुकवरही रिमीने प्रतिक्रिया दिली. तिने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, तिने फक्त फिलर्स, बोटॉक्स आणि पीआरपी ट्रीटमेंट घेतली आहे. फेस लिफ्टसारख्या मोठ्या उपचारांचा विचार सध्या तरी नाही, असंही तिने स्पष्ट केलं. योग्य स्कीनकेअर आणि ट्रीटमेंटमुळे चांगली त्वचा मिळू शकते, असा सल्लाही तिने दिला. बॉलिवूडपासून बिझनेस वर्ल्डपर्यंतचा रिमी सेनचा हा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.




