भरधाव कारने चिरडले; चार वाहनांच्या चुराड्यासह आरोपी चालकावर गुन्हा दाखल
आयुष्याचा भरोसा कधी संपेल याचा नेम उरलेला नाही, याचा प्रत्यय देणारी एक थरारक आणि दुर्दैवी घटना माटुंग्यात घडली आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास माटुंग्यातील चंदावरकर मार्ग परिसरात सोहराभ रूसी कोतवाल (वय ६५) हे एका हातगाडीवर केळी खरेदी करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी ठाण्याहून आलेल्या एका अनियंत्रित आणि वेगवान कारने त्यांना गाठले. या भीषण अपघातात कोतवाल यांना आपले प्राण गमवावे लागले असून, रस्त्यावरील परिस्थिती पाहून परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्णनन सुर्यनारायणन हा चालक आपली हुंदाई वेन्यू कार घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने प्रथम एका टॅक्सीला धडक दिली आणि त्यानंतर समोर उभ्या असलेल्या कोतवाल यांना थेट हातगाडी आणि स्टीलच्या खांबाच्या मध्ये चिरडले. ही धडक इतकी जोरात होती की कोतवाल काही अंतर फरफटत गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रहेजा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, त्या कारने केवळ माणसाचा बळी घेतला नाही तर रस्त्यावरील टॅक्सी, दुचाकी आणि अन्य एका कारचेही प्रचंड नुकसान केले. केळी विक्रेत्याच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावर उभ्या असताना अचानक ओढवलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.




