प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू सिंह (Abhimanyu Singh) याच्या घरी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचं कोडं सोडवण्यात अखेर ओशिवरा पोलिसांनी यश मिळालं आहे. अंधेरी पश्चिम इथल्या लोखंडवाला परिसरात अभिमन्यूचं घर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कुख्यात आणि सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी जवळपास 92% वस्तू जप्त केल्या आहेत. ही घटना 29 डिसेंबर 2025 च्या रात्री लोखंडवाला इथल्या मॅग्नम टॉवरमधील बंगला क्रमांक 15 मध्ये घडली होती. हा चोर बाथरुमच्या खिडकीतून अभिमन्यू यांच्या घरात घुसला आणि घरातील कपाटात ठेवलेली तिजोरीच त्याने पळवली होती. या तिजोरीत सोन्याचे मौल्यवान दागिने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने यांसह मोठ्या प्रमाणात रोख रक्कम होती.
अभिमन्यू यांच्या घरातून चोरी झालेल्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 1 कोटी 37 लाख 20 हजार रुपये होती. अटकेनंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजार रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले. पोलिसांच्या तपासात आरोपीविषयी धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे चौकशीदरम्यान आरोपीकडून ओशिवरा आणि इतर भागातील अनेक चोरींच्या घटना उघडकीस येऊ शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.




