अरिजित सिंहच्या निवृत्तीच्या चर्चेनंतर अभिजीत सावंतने उघड केली संगीतसृष्टीतील शोषणाची बाजू; रॉयल्टी, फुकट काम आणि गायकांचीच चूक यावर स्पष्ट मत
सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असतानाच, आता मराठी गायक आणि ‘इंडियन आयडॉल’चा पहिला विजेता अभिजीत सावंत याने संगीतविश्वातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने गायकांना कसं फुकट किंवा अत्यल्प मोबदल्यात काम करण्यास भाग पाडलं जातं, याचा थेट आरोप केला आहे.
‘पेंटाराइज स्टुडिओज’ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंत म्हणाला की, अनेकदा गायक एखाद्या सिनेमातून जास्त प्रसिद्ध होऊ नयेत, याचीच काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांना ठराविक आणि मर्यादित मानधन दिलं जातं. संगीत हे फक्त सिनेमाचा एक भाग म्हणून पाहिलं जातं आणि गाणी कितीही गाजली तरी गायकांना त्याचा योग्य मोबदला किंवा रॉयल्टी मिळत नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.
‘बिग बॉस मराठी’मुळे पुन्हा चर्चेत आलेल्या अभिजीत सावंतने सांगितलं की, सिनेमा सुपरहिट ठरतो, गाणी चार्टबस्टर होतात, मात्र गायक आणि संगीतकारांना त्या यशाचा आर्थिक फायदा मिळत नाही. आजही हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत संगीतासाठी रॉयल्टी देण्याची ठोस व्यवस्था नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
उदाहरण देताना अभिजीत म्हणाला की, ‘लफ्जो मे’ या म्युझिक व्हिडीओसाठी संगीत देणारे बिड्डू यांनी परदेशात केलेल्या दोन गाण्यांतून इतकी रॉयल्टी कमावली की त्या उत्पन्नावर संपूर्ण आयुष्य सहज जगता येऊ शकतं. मात्र भारतात एका गाण्यातून असा विचारही करता येत नाही, कारण इथली संपूर्ण सिस्टीमच दोषपूर्ण आहे.
या सगळ्यात गायकांचीही काही प्रमाणात चूक असल्याचं अभिजीत सावंतने मान्य केलं. “पैसे कमी मिळाले तरी हे गाणं माझ्याच आवाजात असावं, या लालसेपोटी अनेक गायक ऑफर स्वीकारतात. हे फक्त नवख्या गायकांचंच नाही, तर मोठ्या नावांच्या गायकांचंही वास्तव आहे,” असं स्पष्ट मत त्याने मांडलं. अभिजीत सावंतच्या या वक्तव्यामुळे संगीतसृष्टीतील रॉयल्टी, मानधन आणि कलाकारांच्या हक्कांवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




