महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, विधानसभा बलाबलानुसार महायुती ६ तर महाविकास आघाडी केवळ १ जागा निवडून आणू शकते. याच एका जागेवरून आता ‘मविआ’मध्ये संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या जागेसाठी आक्रमक दावा केला असून, संसदेत शिवसेनेचा आवाज महत्त्वाचा असल्याचे सांगत रोटेशननुसार काँग्रेसने पुढच्या वेळी संधी घ्यावी, अशी भूमिका मांडली आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांची जागा राखण्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही असले, तरी दुसरीकडे संजय राऊत यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. एकाच पक्षात दोन भिन्न सूर उमटत असल्याने आणि घटक पक्षांमध्ये या एका जागेवरून रस्सीखेच सुरू झाल्याने, महाविकास आघाडीत या विषयावरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.




