कुटुंबाचा सल्ला न ऐकता स्वतःच्या मर्जीने घेतले निर्णय
वेब सीरिज ‘आश्रम’चे तीनही सिझन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या मालिकेत पम्मीची दमदार भूमिका साकारून मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहणकरने (Aaditi pohankar) विशेष लक्ष वेधलं. तिने या शोमध्ये अनेक इंटिमेट सीन्स दिले असून सहकलाकार चंदन रॉय (Chandan Roy) सान्यालसोबतही तिचे काही बोल्ड सीन होते. यापूर्वी ‘शी’ (She) मध्येही अदितीने एक प्रभावी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अदितीने सांगितलं की तिने या सर्व भूमिका पूर्णतः स्वतःच्या मर्जीने स्वीकारल्या. तिच्या नातेवाईकांनी, मित्रांनी आणि कुटुंबियांनी अशा बोल्ड भूमिका टाळायला सांगितलं होतं. पण अदिती म्हणते, “योग्य-अयोग्य असं काही ठरलेलं नसतं. प्रत्येकाने आपल्यासाठी योग्य काय ते स्वतःच ठरवायला हवं.”
ती पुढे म्हणाली, “माझा लूक ग्लॅमरस नाही, तू बोल्ड दिसत नाहीस… असं अनेकांनी सांगितलं. पण मी एकच उत्तर दिलं ‘तुम्ही वेडे आहात!’ मी त्या भूमिका पटकथा न वाचताच स्वीकारल्या होत्या आणि त्याबद्दल मला अजिबात खंत नाही.”
इंटिमेट सीन्सबाबत चंदन रॉय सान्याल म्हणतो, “सेटवर मर्यादित लोक असायचे. अदिती खूप प्रोफेशनल आहे. अशा सीन्समध्ये विश्वास आणि आराम देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण हे जग महिलांसाठी आधीपासूनच सोपं नाही.” एकूणच,अदितीने बाहेरच्या दबावाला न जुमानता स्वतःची ओळख आणि कलाकारी जपण्याचा मार्ग निवडला आणि तो प्रेक्षकांनीही मनापासून स्वीकारला.




