थंड हवामानात अनेकजण शरीर गरम ठेवण्यासाठी चहा-कॉफीसोबतच थोडीशी रम, ब्रँडी किंवा इतर अल्कोहोल घेतात. “थोडं मद्य घेतलं की उब मिळते, सर्दीखोकला दूर राहतो,” असा अनेकांचा समज असतो. लहान मुलांना सर्दी झाल्यावरही चमचा भर ब्रँडी देण्याचा पारंपारिक सल्ला ऐकायला मिळतो. पण खरंच यात काही विज्ञान आहे का? डॉक्टरांचे मत मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
फेलिक्स हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. डी. के. गुप्ता सांगतात की दारू शरीराला गरम ठेवते हा लोकांमध्ये पसरलेला एक मोठा गैरसमज आहे. अल्कोहोल घेतल्यानंतर रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे काही क्षण शरीर गरम झाल्यासारखे वाटते. पण हे फक्त बाह्य जाणवणारे उष्णतेचे भास असते.
त्यांच्या मते, प्रत्यक्षात शरीराचे कोर तापमान झपाट्याने कमी होऊ लागते. म्हणजेच, शरीराच्या आतली उष्णता कमी होते आणि थंडी अजून जास्त लागू शकते. त्यातून सर्दी-खोकला किंवा इतर त्रास होण्याची शक्यता वाढते.
डॉ. गुप्ता पुढे सांगतात की थोडी रम घेतल्याने उब मिळते हा समज चुकीचा असून, त्याने उलट इम्युनिटी कमी, डिहायड्रेशन, झोपेचा त्रास आणि मूड-स्विंग्स होण्याचा धोका वाढतो. म्हणजेच थंडीपासून संरक्षणासाठी मद्याचा आधार घेणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.




