निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. जगभरातले अनेक देश भारतातून ही शाई घेतात, तर मग आपल्या इथे ही शाई नेमकी कुठे बनवली जाते?

ही शाई भारतात दोन ठिकाणी बनते हैदराबादमधल्या रायुडू लॅबोरेटरीमध्ये आणि म्हैसूरमधील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये.

म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीने बनवलेली शाई निवडणूक आयोग देशातील बहुतांशी निवडणुकींसाठी वापरतो. 

रायुडू लॅबोरेटरीमध्ये बनलेली शाई जगातील दुसऱ्या देशांमध्ये वापरली जाते.

जगातील जवळपास 90 देशांमध्ये या शाईचा वापर होतो. त्यापैकी 30 देशांमध्ये म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेड शाई पाठवते.

सुरुवातीला ही शाई छोट्या बाटल्यांमध्ये भरून निर्यात केली जायची.

रायुडू लॅबोरेटरीचे सीईओ शशांक रायुडू यांच्या मते आता तंत्रज्ञान बदललं आहे. 2014 नंतर या पुसल्या न जाणाऱ्या शाईने बनवलेले मार्करच निर्यात केले जाऊ लागले आहेत.

या शाईचा उपयोग हा पल्स पोलिओ कार्यक्रमातही केला जातो. ज्या मुलांना पोलिओची लस दिली जाते, त्यांच्या बोटावरही या शाईने खूण केली जाते.

निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. पण तुम्हाला या मागील कारण माहित आहे का ?