देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे (BMC Election) बिगुल वाजले असून, अवघ्या काही दिवसांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील प्रभाग क्रमांक 107 मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाच्या युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवार नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे.
भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार भरत दणाणी यांचा उमेदवारी अर्ज आवश्यक प्रतिज्ञापत्र न जोडल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीतच बाद केला. त्यामुळे या प्रभागातील प्रमुख विरोधी उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याने नील सोमय्यांसमोरील थेट आव्हान संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांनी या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा सोडली होती. मात्र, युतीतील उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने ठाकरे–पवार आघाडीचा या प्रभागातील डाव फसल्याचे मानले जात आहे.




