Kalyan Crime : कल्याणमध्ये ‘बंटी-बबली’ डॉक्टरांचा ७० लाखांचा गंडा; अखेर एकाला ठोकल्या बेड्या

spot_img

हॉस्पिटल आणि मेडिकलच्या नावाखाली सहकाऱ्यांचीच फसवणूक; फरार डॉक्टर पती गजाआड, पत्नीचा शोध सुरू

ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, त्याच पेशातील एका दांपत्याने आपल्याच सहकाऱ्याला ७० लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. ठाण्यातील डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी कल्याणमधील डॉ. राहुल दुबे आणि एका फार्मासिस्टला ५० बेडच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करून देण्याचे आमिष दाखवले. या ‘बंटी-बबली’ जोडीने तब्बल ८० लाखांची मागणी केली होती, ज्यापैकी ७० लाख रुपये त्यांनी हडपले. मात्र, आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी ना हॉस्पिटल सुरू झाले ना मेडिकलची जागा मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी पोलिसांत धाव घेतली.

गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या दांपत्यापैकी डॉ. प्रसाद साळी याला खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याची पत्नी वैशाली अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे, अटक टाळण्यासाठी या दांपत्याने न्यायालयात धाव घेतली होती, परंतु गुन्ह्याचे गांभीर्य पाहून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात आता पोलीस हे शोधत आहेत की, या फसवणुकीच्या जाळ्यात अजून किती डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्ट अडकले आहेत. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ