काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद जागतिक स्तरावरही उमटत आहेत. (India Vs Pakistan) इस्रायलने हमाससोबत जे केले, तेच पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आयएसआयसोबत भारताने केले पाहिजे, असे मत अमेरिकेच्या पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी व्यक्त केलेले असतानाच एका ज्येष्ठ ब्रिटिश खासदारानेही संताप व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने कोणतेही पाऊल उचलले तरी, आम्ही त्याच्यासोबत राहू. अगदी, भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कोणतीही लष्करी कारवाई केली तरी त्यालापूर्ण पाठिंबा असेल, असे ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी म्हटले आहे. (British MP Bob Blackman assures full support to India in military action)
यूकेमधील भारतीय उच्चायुक्तालयात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक ब्रिटिश खासदार आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी भारताचे समर्थन करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने जे योग्य वाटेल ते पाऊल उचलावे, जरी ती लष्करी कारवाई असली तरी, त्याला आपले पूर्ण समर्थन असेल, असे ते म्हणाले. कोणताही दहशतवादी हल्ला हा संपूर्ण मानवतेवरील हल्ला असतो. पहलगाम येथे झालेला हल्ला हा धार्मिक द्वेषचे दर्शवतो आणि हे अजिबात सहन केले जाऊ शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, मी हा मुद्दा ब्रिटिश संसदेत (House of Commons) उपस्थित केला आणि सरकारला भारताला ठोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
भारत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध जी काही कारवाई करेल त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. दहशतवाद्यांना कायद्यासमोर उभे करता येत नसेल तर, तर त्यांना संपवले पाहिजे. भारताने नियंत्रण रेषा ओलांडून जरी कारवाई केली तरीही ब्रिटनमधील सर्व राजकीय पक्ष भारतासोबत उभे राहतील, अशी मला आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉब ब्लॅकमन हे इंग्लंडमधील हॅरो ईस्टचे कंझर्व्हेटिव्ह खासदार आहेत. त्यांना भारताचा पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. आपल्या काश्मीर भेटीची आठवण सांगताना ब्लॅकमन म्हणाले, त्यांनी नऊ वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्याला भेट दिली होती आणि खोऱ्याचे सौंदर्य अजूनही माझ्या मनात कोरले आहे. या खोऱ्यात पर्यटन वाढू नये, अशी इच्छा दहशतवादयांची आहे, परंतु आम्ही त्यांना तसे करू देणार नाही, असेही त्यांनी बजावले.