पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. (Pahalgam Terror Attack) काश्मीरमधून दहशतवाद आम्ही संपवला, असा प्रचार झाल्यामुळे देशभरातून पंचवीस लाख पर्यटक काश्मीरला पोहोचले आणि हे असे अघटित घडले. पहलगामच्या घटनेचे राजकारण करू नये, अशी समज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दिली जात आहे. पहलगाम हल्ल्याने सरकारी दाव्याचा फुगा फुटल्याने या विषयाचे राजकारण करू नका, असे ते बोलू लागले आहेत. एखाद्या दुःखद घटनेचे राजकारण करू नये हे पथ्य या मंडळींनी मागच्या दहा वर्षांत पाळले असते तर आज अशी विनवण्या करण्याची वेळ आली नसती, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे. (Uddhav Thackeray criticizes Modi government)
जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-काश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून काय मिळवले, याचे उत्तर सरकार देणार नाही. सरकारने प्रचंड सैन्यकपात केली, संरक्षण खात्याच्या आर्थिक तरतुदीत घट केली. हा खेळ खतरनाक आहे. पुलवामा येथे सैन्य तुकड्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही आणि पहलगाम येथे हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले. आता हल्ला झाला व निरपराध माणसे मारल्यावर लोकांत संताप उसळल्यावर सरकार धावपळ करीत आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.
भारताच्या 5 घातक निर्णयांनंतर पाकचे 6 पलटवार
सरकारने ‘पहलगाम’ हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली हे नेहमीचेच आहे. जे सरकार एरव्ही विरोधकांचे आवाज दडपत असते, काश्मीरपासून मणिपूरपर्यंत कोणत्याच विषयांवर संसदेत चर्चा करायला तयार नाही ते सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावून काय दिवे लावणार? देशाचे गृहमंत्री राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत ते अपयशी ठरले. त्यांना हटवा ही सर्वपक्षीय मागणी आहे. त्या मागणीचा विचार सरकार करणार नसेल तर बैठकांचे फार्स हवेतच कशाला? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ‘बदला घेऊ, अद्दल घडवू’ अशी भाषणे झाली. संसदेत तसेच जाहीर सभांतून मांड्या ठोकल्या. उरीचा बदला म्हणून पाकव्याप्त काश्मीरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. तेव्हा असे सांगितले की, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून पाकड्यांना जन्माची अद्दल घडली, पण तसे झाले नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आणि 1971 साली थेट युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तरीही पाकड्यांचे शेपूट वाकडेच राहिले, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.