जम्मू काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, बुधवारी तातडीने भारतात परत येत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा तीव्र निषेध करत अनेक कठोर निर्णय घेतले. आता केंद्र सरकारने आज, गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मांडताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रावर संकट असताना सरकार जी भूमिका तसेच निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. (Thackeray group supports Modi government’s decisions)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज, गुरुवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अशा प्रसंगात विरोधी पक्ष आणि सरकारमध्ये मतभेद असता कामा नये. राष्ट्रावर संकट असताना सरकार जी भूमिका तसेच निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. संकटकाळी हा देश एक आहे, हे दाखवणे गरजेचे असते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर निर्णयांची सविस्तर माहिती या बैठकीत दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, एवढ्या कमी वेळात कितीजण या बैठकीला उपस्थित राहतील, याबाबत शंका आहे. पण, सरकारने भूमिका घ्यावी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हाच सूर या बैठकीचा असेल, असे ते म्हणाले
फक्त एवढेच की ज्या सूचना विरोधी पक्ष करतात, त्यांचे पालन करणार असाल तरच या बैठकींना महत्त्व आहे. सर्व अक्कल सत्ताधाऱ्यांकडे आहे, असे नसते. विरोधकांनीही कधीकाळी हा देश चालवला आहे आणि पाकिस्तान सारख्या शत्रूशी टक्कर दिलेली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.