18.2 C
New York

Pahalgam Attack : डोंबिवली बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सर्वपक्षीय एकजूट

Published:

काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन (Pahalgam Attack) खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीतील तिघांसह महाराष्ट्रातील एकूण सहाजणांचा यात समावेश आहे. डोंबिवलीतील तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण डोंबिवली शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा निषेधार्थ डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी शहर बंदची हाक दिली. या बंदला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Citizens’ spontaneous response to Dombivli bandh)

पहलगाम येथील हल्ल्यात डोंबिवली पश्चिममधील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांचे पार्थिव भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप दिला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘केंद्र सरकार जागे व्हा’ अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी रेल्वेस्थानक परिसरात जमून केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणांवर सडकून टीका केली. “सामान्यांचे बळी जात असताना नेतेमंडळी एक्स, वाय, झेड सुरक्षेत वावरतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिलेसह अनेकांनी दिली.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक राहुल दामले, दीपेश म्हात्रे, अभिजीत सावंत, राजेश कदम, विवेक खामकर, राहुल कामत आदी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत गुरुवारी डोंबिवली बंदची घोषणा केली.

त्यानुसार डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील सर्व बाजारपेठा, दुकाने गुरुवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली. रेल्वेस्थानक परिसर, अंतर्गत रस्त्यांवरील नेहमी गजबजणारी दुकानेही पूर्णतः बंद होती. बंद दरम्यान नागरिक, नोकरदार, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा, केडीएमटी आणि नवी मुंबई परिवहन सेवा सुरू ठेवण्यात आली. मात्र बाजारपेठ पूर्णतः बंद असल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी होती. अनेक खासगी आस्थापनांनीही आपली कार्यालये बंद ठेवली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img