प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर सध्या त्यांच्या कुटुंबासोबत (Pahalgam Attack) काश्मीरच्या सफरीवर गेले होते. ते तिथून सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात होते. मात्र, मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली.
शोएब इब्राहिमनं लगेचच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आणि दीपिकासह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेची माहिती दिली. तो म्हणाला की, “आम्ही मंगळवारी सकाळीच काश्मीर सोडून दिल्लीला पोहोचलो आहोत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आमच्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार.”
शोएब आणि दीपिका काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करत होते. आधी ते दिल्लीत होते आणि तिथले विविध खाद्यपदार्थ चाखत होते. त्यानंतर कुटुंबासह ते काश्मीरमध्ये गेले आणि तिथल्या सुंदर निसर्गसौंदर्याचा आनंद घेत फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत राहिले.
दरम्यान, मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांचा गणवेश घालून देशी आणि विदेशी पर्यटकांवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं घटनास्थळी जाऊन सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. यामुळे भयभीत झालेले अनेक पर्यटक आता काश्मीर सोडून आपल्या राज्यांकडे परतू लागले आहेत.