दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्ही चॅनेलशी दूरध्वनीवरून बोलताना म्हटले की, पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पण भारतात असलेल्या अस्वस्थ बंडखोर संघटनांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. भारतात बंडखोरांच्या अशा अनेक संघटना आहेत, एक-दोन नव्हे तर डझनभर आहेत. अगदी नागालँडपासून काश्मिरपर्यंत आहेत. दक्षिणेत आहेत, छत्तीसगड, मणिपूरमध्ये आहेत, असे ते म्हणाले.
पाकिस्तानची बाजू मांडताना ख्वाजा आसिफ यांनी अल्पसंख्याकांचा राग आळवला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध स्थानिकांचे बंड असून ही लोक आपला हक्क मागत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या अल्पसंख्याकांचे शोषण करणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारविरुद्ध बंडखोरी करण्यात आली आहे. भारतात जे काही घडत आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही दहशतवादाचे समर्थन करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Pahalgam Terror Attack पाकपुरस्कृत संघटनेचाच पहलगाम हल्ल्यात सहभाग
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दी रेझिस्टंट फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने टीआरएफची स्थापना केली आहे. 2019मध्ये जम्मू–काश्मिरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवले, तेव्हा ही संघटना समोर आली. टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर -ए- तैयबाचाच एक भाग मानली जाते. सरकारने या संघटनेला यापूर्वीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.