पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आयपीएल २०२५ वर परिणाम झाला आहे. (Pahalgam Attack) २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. अश्यातच आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ काळ्या रंगाच्या पट्ट्या हाताला बांधणार आहेत. सामन्यात चिअरलिडर्स आणि आतषबाजी रद्द करण्यात आली आहे तसेच, सामन्यापूर्वी एक मिनिटाचे मौन देखील पाळण्यात येणार आहे.. बीसीसीआयने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना आदर व्यक्त करण्याचे निर्देश आहेत.
हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये दोन परदेशी पर्यटक, एक भारतीय नौदल अधिकारी आणि एक गुप्तचर विभागाचा अधिकारी यांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी पीडितांचे धर्म विचारून आणि इस्लामिक वचने बोलण्यास सांगून हल्ला केला. सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे (स्केचेस) जाहीर केली आहेत. त्यांची नावे असिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह उच्चस्तरीय बैठक घेतली. जम्मू-काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. विराट कोहली याने इन्स्टाग्रामवर या हल्ल्याचा निषेध करत बळींच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि न्यायाची मागणी केली. माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हफीझ याने ट्विटरवर “Sad & heartbroken” असे लिहित दुख व्यक्त केले.