जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी येथे आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. खोऱ्यातील अशा प्रकारे झालेला हा पहिलाच हल्ला नाही. गेल्या 25 वर्षांतील हा 12वा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यांमध्ये 237 सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Terrorist Attack: 12 major attacks in Jammu and Kashmir in the last 25 years)
Terrorist Attack जम्मू आणि काश्मीरमध्ये सन 2000पासून सर्वसामान्यांवर झालेले दहशतवादी हल्ले –
अनंतनाग जिल्ह्यात शिखांवरील हल्ला
शिखांवरील हा दहशतवादी हल्ला 21 मार्च 2000च्या रात्री अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपोरा गावात झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक शीख समुदायाला लक्ष्य केले. एकूण 36 जणांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. तर अनेक लोक जखमी झाले होते.
पहलगामच्या नुनवान तळावर दहशतवादी हल्ला
ऑगस्ट 2000मध्ये पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पवर हल्ला करून दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात स्थानिक लोकांसह एकूण 32 यात्रेकरू ठार झाले होते.
अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा हल्ला
जुलै 2001मध्ये अमरनाथ यात्रेकरूंना दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 13 जणांना ठार मारले. हा हल्ला अनंतनागमधील शेषनाग बेस कॅम्पवर झाला होता.
विधानसभेच्या परिसरात आत्मघातकी हल्ला
जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथील राज्य विधिमंडळ परिसरात 1 ऑक्टोबर 2001 रोजी आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
चंदनवाडी कॅम्पवर हल्ला
काश्मीरमधील चंदनवाडी बेस कॅम्पवर 2002मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 11 अमरनाथ यात्रेकरू ठार झाले.
दक्षिण काश्मीरमध्ये मोठा हल्ला
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर 23 नोव्हेंबर 2002 रोजी मोठा हल्ला झाला होता. Improvised Explosive Device चा वापर करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आपला जीव गमवला.
पुलवामा जिल्ह्यात 24 काश्मिरी पंडित लक्ष्य
23 मार्च 2003 रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील नंदीमार्ग गावात हल्ला केला होता. 11 महिला आणि 2 मुलांसह किमान 24 काश्मिरी पंडितांना या हल्ल्यात ठार मारले होते.
पुलवामा पुन्हा निशाण्यावर
दहशतवाद्यांनी 13 जून 2005 रोजी पुन्हा एकदा पुलवामाला लक्ष्य केले. सरकारी शाळेसमोरील गर्दीच्या बाजारात स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता.
परप्रातीयांवर हल्ला
दहशतवाद्यांनी 12 जून 2006 रोजी परप्रातीयांना लक्ष्य केले. 9 नेपाळी नागरिक आणि बिहारी कामगार काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते.
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला
10 जुलै 2017 रोजी काश्मीरमधील कुलगाम येथे अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला.
मोदींच्या शपथविधीच्या दिवशी हल्ला
09 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याच वेळी जम्मूतील रियासी येथे वैष्णव देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू तर अन्य सुमारे 30 जण जखमी या हल्ल्यात झाले होते.
पहलगाम पुन्हा निशाण्यावर
22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात सहा पर्यटक महाराष्ट्रातील आहेत.