महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Raj – Uddhav Alliance) खासदार संजय राऊतांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे या एकत्रीकरणाच्या बाबतीत कमालीचे सकारात्मक असल्याचे म्हंटले आहे. दोघेही ठाकरे बंधू सध्या परदेशात आहेत. राज ठाकरे हे २९ एप्रिलला मुंबईत परतण्याचे बोलले जात आहे आणि त्यानंतर ते या विषयी आपली भूमिका सविस्तर मांडणार आहेत. त्यानंतरच कदाचित महाराष्ट्रात सुरु असलेली ही चर्चा शमेल असे दिसतेय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडूनही राज ठाकरेंना महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न होतानै दिसत आहे. राज ठाकरेंचा मनसे अचानक राज्यातील राजकारणाच्या मध्यभागी का आला? काय खरच ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाला, महाराष्ट्राला व विशेषत: उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही फायदा होईल? काय मनसे महायुतीसाठी आपले उपद्रव मुल्य सिद्ध करुन दाखवेल?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता, तर दादर माहिम मतदारसंघातून मनसेचा आमदार निवडून आला असता. असे असतानाही राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना स्वतःच्या घरी जेवायला बोलावले आणि शिंदेही त्यांच्या घरी जेवायला गेले, त्याचे कारण काय? कारण, राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल, ईव्हीएममधील कथित घोटाळा आणि महाकुंभमेळ्याविरुद्ध तीव्र टिप्पणी केली आहे. याचे उत्तर एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्या भेटीमधून समोर आले. खरं तर राज ठाकरे यांनी याआधीही अशाच प्रकारच्या दबावाचा वापर केला होता. त्यांनी याआधीही ईव्हीएममधील कथित घोटाळ्यासंदर्भात विधानं केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आताही असाच काहीसा प्रयत्न पुन्हा झालेला दिसला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना व या निवडणुकींमध्ये काही शे मतांनी जय-पराजय होत असताना लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेण्याची चढाओढ सर्वच बड्या राजकीय पक्षांकडून होत असते. त्यातच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईतुन मिळवलेली मतं लक्षवेधक आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची आहे. जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, अशी ग्वाही दिली आणि आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही आकडेवारीही सादर केली. राज ठाकरे यांनी महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने समीकरणे बनवण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत केलेली भेट त्याचाच एक भाग होती. आणि आता उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची चर्चादेखील त्याच रणनीतिचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत मुंबई महामगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मनसे सध्या दोन्ही महत्वाच्या पक्षांसाठी महत्वाचा का झाला याची चर्चा करणे गरजेचे आहे.
२०२१ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी २२७ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. मात्र, २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे केवळ ७ नगरसेवक निवडून आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मुंबईत ३. ८४ लाखांहून अधिक मते होती. ज्यामध्ये ७ विधानसभा मतदारसंघात २० हजारांहून अधिक, ६ विधानसभा मतदारसंघात १० हजारांहून अधिक, ११ विधानसभा मतदारसंघात ५ हजारांहून अधिक व्होट बँक आहे. अशाप्रकारे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडे मुंबईत एकूण ४. ०७ लाखांहून अधिक व्होट बँक असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांना वाटत होते की, येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरेंची ही व्होट बँक महायुतीसोबत आली, तर मुंबई महानगरपालिकेत विजय सोपा होईल. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवता येईल. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणे हे भाजप व शिंदे गटाचे लक्ष्य आहे. हे राजकीय लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमितचा पराभव काही काळासाठी बाजूला ठेवला आहे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत नवीन राजकीय समीकरणे बनवण्यास सुरुवात केली होती. परंतु आता पुन्हा नव्याने राज ठाकरे समीकरणं बनवत असल्याची चर्चा आहे. या नवीन समीकरणात २० वर्षांपुर्वी साथ सोडलेल्या आपल्या भावासोबत ते जाणार की महायुतीचा भाग बनणार हे पाहणे महत्वाचे असेल.