बीसीसीआयने अखेर केंद्रीय कराराची घोषणा केली आहे. बराच काळ याची प्रतीक्षा होती आणि उशिरा का होईना, पण आता ते जाहीर झाले आहे. यंदाही ए प्लस ग्रेडमध्ये चार खेळाडूंना स्थान मिळाले असून यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत रोहित फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता. त्याला शेवटच्या कसोटीत अंतिम अकरामधून स्वतःला वगळावे लागले होते. त्यामुळे तेव्हापासून त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. रोहितने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे, त्यामुळे लोकांना वाटत होते की आता तो कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होईल.
मात्र बीसीसीआयच्या ताज्या निर्णयावरून स्पष्ट होते की, रोहित लवकरच कसोटी क्रिकेट सोडणार नाही. जूनमध्ये जेव्हा भारत इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोट्यांच्या मालिकेसाठी जाईल, तेव्हा रोहितच संघाचे नेतृत्व करेल, अशी शक्यता आहे. अजून संघाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अशी चर्चा आहे की बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करार जाहीर करण्यापूर्वी रोहितशी संवाद साधला होता.
जर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे विचार करत असता, तर त्याला A+ ग्रेड मिळाले नसते. त्यामुळे रोहित अजून काही काळ कसोटी क्रिकेट खेळणार हे निश्चित आहे. रोहितला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातही खेळायचे आहे, कारण त्याच्यासाठी खरा वर्ल्ड कप म्हणजे एकदिवसीय विश्वचषकच आहे, असे तो आधीच सांगितले आहे. सध्या रोहित टी-20 क्रिकेटमध्ये खेळत नाही, फक्त आयपीएलमध्ये दोन महिने खेळतो आणि मुख्य लक्ष एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवर केंद्रित आहे. सध्या त्याचा फॉर्म थोडा कमकुवत आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.