सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. ‘मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut’s reaction on Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together)
दोन्ही ठाकरे आहेत आणि दोघेही भाऊ आहेत. हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाल्यावर दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरीही उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा नेहमी महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचं वक्तव्य मी स्वत: आणि उद्धव ठाकरे यांनी ऐकलं. राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे, महाराष्ट्र हितासाठी, तसेच जे काही वाद आहेत, ते मिटवायला मी तयार आहे. यावर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, आमच्यात कोणताही वाद किंवा भांडण नाही आणि असलं तरी मिटवायला वेळ लागत नाही. फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते की, या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या ज्या फौजा आहेत, त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये. भाजपासोबत आमची 25 वर्षे युती होती आणि त्यातला काही काळ राज ठाकरे सुद्धा त्या युतीमध्ये सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना. पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला बाजूला व्हायला लागलं, अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
Sanjay Raut …अशांना आम्ही घरात घेणार नाही
लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की, याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल, अशी भूमिका घेऊ नये, असं आम्ही सांगितलं होतं. हे योग्य नाही महाराष्ट्राला परवडणारे नाही, ही भूमिका आजही आमची आहे. महाराष्ट्राचे शत्रू आमचे शत्रू अशी भूमिका कोणी घेत असेल तर त्यांचे स्वागत आहे. सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बोलतात वेगळं आणि करतात वेगळं, पण अशांना आम्ही थारा देणार नाही. हा विचार राज ठाकरेंनी करणं गरजेचं आहे. परंतु साद प्रतिसादाची भूमिका दोन्ही ठाकरेंनी घेतली असेल तर सकारात्मक भूमिकेची आम्ही वाट पाहात आहोत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. परंतु आजही आमच्यात अशी शक्ती आहे की, मराठी माणसाचे नुकसान व्हावे आणि महाराष्ट्राला जे पाण्यात पाहात आहेत अशांना आम्ही घरात घेणार नाही, असे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले.