मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराडचा एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला (Ranjit Kasale) अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (18 एप्रिल) पहाटे स्वारगेट येथून ताब्यात घेण्यात आले असून तो पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती याआधीच देण्यात आली होती. त्यासाठी तो गुरुवारी (17 एप्रिल) दिल्लीतून पुण्यात आला होता. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा काही गंभीर आरोप केले असून अनेक दावे केले आहेत. (Suspended PSI Ranjit Kasale arrested by Beed Police in Pune)
Ranjit Kasale अटकेपूर्वी केला हा दावा
बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा गुरुवारी, 17 एप्रिलला दिल्लीहून पुण्यात आला होता. यावेळी पुण्यात पोहोचताच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच, यावेळी पत्रकारांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या प्रश्नावर आता उत्तर देणार नाही, असे स्पष्ट केले. पण यावेळी त्याने आणखी एक खळबळजनक दावा केला. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासलेने यावेळी केला. तसेच, यावेळी त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याचेही सांगितले होते. पण, त्याआधीच आत्मसमर्पण करण्याआधीच त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुण्यातील स्वारगेटमध्ये असलेल्या एका हॉटेलमधून शुक्रवारी, 18 एप्रिलला पहाटे बीड पोलिसांनी रणजीत कासलेला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून रणजित कासले मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत गंभीर आरोप करत आहे. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा त्याने केला होता. तसेच, “मी जे पुरावे मी सादर करतोय मला त्याबाबत विचारावे. ज्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले,” असा दावा त्याने केला