वरळी विधानसभा मतदरसंघातील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणी समस्येबाबत शिवसेनेकडून (Uddhav Thackeray) वार्ड स्तरावर आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडेदेखील वारंवार तक्रार करण्यात आली, मात्र पाणी समस्या न सुटल्याने अखेर पालिकेच्या जी / दक्षिण विभाग कार्यालयावर बुधवारी 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ’हंडा मोर्चा’ काढून धडक देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
या मोर्चात माजी मंत्री शिवसेनेचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी नगरसेवक व विभागप्रमुख आशिष चेंबुरकर आदींसह शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ऑक्टोबर महिन्याच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना वरळी विधानसभा मतदरसंघातील नागरिकांना दूषित आणि अपुर्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
वरळी येथील पाणी समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे युवानेते, माजी मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात येऊन थेट आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिमंदिर, एकता प्रसाद सोसायटी, ग्लोब मिल पॅसेज शाळेसमोर, पांडुरंग बुधकर मार्ग याठिकाणी एकत्रित जमून महापालिकेच्या जी / दक्षिण विभाग कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.