मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली. या महोत्सवात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार असून 21 एप्रिलला उद्घाटन झाल्यानंतर राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट ओपनिंग तर 24 एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित व निर्मिती ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच येथे 22 एप्रिल रोजी ‘पाणी’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘येरे येरे पावसा’ हे चित्रपट दाखविण्यात येणार असून ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’ आणि तिच शहर होणं, मराठी भाषेवर आधारित ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘या गोष्टीला नावचं नाही’, हे चित्रपट दाखविले जातील.‘गोदाकाठ’, पळशीची पीटी, आणि ‘झॉलिवूड’ ‘भेरा’, विनोदी चित्रपट ‘चोरीचा मामला’ आणि ‘पॉडीचेरीऋ हे चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, 23 एप्रिल ‘बार्डे’, ‘गोदावरी’ आणि शेतकरी आत्महत्येवरील ‘तेरव’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ‘स्थळ’, ‘गिरकी’ आणि स्वातंत्र्य संग्रामावरील ‘शहिद भाई कोतवाल’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेवर आधारित ‘जयंती’, ‘गाभ’ आणि ‘फनरल’ ‘पोटरा’, ‘अमलताश’ आणि ‘कुलुप’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. त्याचबरोबर ‘मी वसंतराव’ हा बायोपिक, ‘बापल्योक’ आणि ‘छबिला’ हे चित्रपट दाखविले जातील.
24 एप्रिल रोजी ‘स्वीट ॲण्ड शॉर्ट’, ‘रौंदळ’ आणि महेश मांजरेकर यांचा ‘जुन फर्नीचर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ‘मदार’, ऐतिहासिक असा ‘पावनखिंड’ आणि ‘कारखानिसांची वारी’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, आणि ‘वाय’ हे चित्रपट दाखविले जाणार असल्याची घोषणा मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज केली.
वरील सर्व चित्रपट सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरएण विषयक, स्त्री जीवनाविषयक प्रश्न मांडणारे, बालचित्रपट, विनोदी, एक्शन, व्यावसायिक असे यशस्वी झालेले चित्रपट असून चित्रपट रसिकांना हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील. याकरिता ऑनलाईन नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी ऑफलाईन नावनोंदणी देखील सुरू आहे.