केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत. (Maharashtra Politics) थोड्याच वेळात शहा पुण्यातून रायगडकडे रवाना होणार आहेत. मात्र याआधीच एक राजकीय घडामोड घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते येथे येतील. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अमित शाहांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी आमंत्रण स्वीकारल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यात काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. महायुती सरकार स्थापन होऊन चार ते पाच महिने उलटून गेले तरी जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. आता शाहांच्या दौऱ्यात हा प्रश्न निकाली निघेल अशी चर्चा आहे.
रायगड दौऱ्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात आले. येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. भेटीत काय चर्चा झाली याची ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. मात्र येथे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. अमित शाह यांच्या आजच्या दौऱ्यात दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत आहे.