गुन्हेगारीच्या (Mumbai News) घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात सातत्याने वाढत आहेत. आताही गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
या गोळीबारात बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान जखमी झाले आहेत. चेंबूर येथील डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला. यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा ड्रायव्हर होता. सायन-पनवेल महामार्गावरून मु्ंबईकडे जात असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे.
यातील एक गोळी खान यांच्या दाढेत अडकली. यानंतर त्यांनी तातडीने झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढे त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या दाढेत अडकलेली गोळी काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी खान यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यानंतर लगेचच पळून गेले. आता या आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी मध्यरात्री पंचनाम्याचे काम पूर्ण केले. ज्या वाहनावर गोळीबार झाला त्या वाहनाचाही पंचनामा करण्यात आला. गोळीबार झाला त्यावेळी खान आणि त्यांचा चालक गाडीत होते. यानंतर खान यांच्या चालकाने एक किलोमीटरपर्यंत गाडी पळवल्याचे सांगण्यात आले.