लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी (Mahohare Case) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली होती. आयुक्त मनोहरे यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहरे यांनी असा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना कुणाचा तरी फोन आला होता. या फोनवरील संभाषणानंतर त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा फोन नेमका कुणी केला होता? कोणत्या कारणासाठी केला होता? फोन करणारी व्यक्ती कोण होती? फोनवर नेमकं काय बोलणं झालं? या गोष्टी आता पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच समजतील. मनोहरे यांच्याकडील आयफोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
Mahohare Case पोलिसांच्या पंचनाम्यात काय ?
या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. आयुक्त मनोहरे आणि त्यांच्या पत्नीत मुलांसमोरच वाद झाला होता. यावेळी आयुक्त मद्यधुंद अवस्थेत होते अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या माहितीचा पंचनाम्यात उल्लेख केला आहे. कौटुंबिक वादातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होत आहे.
मनोहरे आणि त्यांच्या पत्नीत वाद झाले होते. या तणावात त्यांनी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही घटना घडली त्यावेळी या भागात एक अपघात झाला होता. त्यामुळे पोलीस कर्मचारी याच भागात होते. मनोहरे यांच्या बंगल्याच्या मागेच पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे. त्यामुळे घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच पोलीस येथे पोहोचले होते. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या ठीकाणाहून पोलिसांनी पिस्तूल, 25 काडतुसे आणि मद्याचे पुरावे गोळा केले.
Mahohare Case उपचारासाठी मुंबईला हलवले
मनोहरे यांना आधी लातूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे. काल (सोमवार) एअर अॅम्ब्यूलन्सने मनोहरे यांना लातूर विमानतळावरून मुंबईला नेण्यात आले. मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडली होती. यामुळे कवटीची हाडे मेंदूत अडकली. लातुरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र मेंदूच्या काही भागांतील संवेदना कमी झाल्या आहेत. यासाठी मनोहरे यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.