राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत चालल्या असून पुढचे 24 तास उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आगडोंब उडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकणात होरपळ अधिक जाणवणार आहे. कर्नाटकच्या अंतर्गत भागावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव असून, मराठवाडा आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागात अद्यापही कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं राज्यात ढगाळ हवामान निर्माण झालं आहे. मात्र या हवामानात पुन्हा एकदा तापमान वाढू लागल्यामुळं उकाड्याची तीव्रता वाढली आहे.
Heat Wave विदर्भात चाळीशी पार, कोकणात यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे विदर्भातील अकोला, नागपूर, यवतमाळ, अमरावतीसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीत पारा चाळीशी पार पोहोचला आहे. हवामान विभागाने पुढील 2-3 दिवस तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोकणात दमट हवामानामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. दमटतेचा त्रास आणि उकाडा यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. जळगाव, नाशिक, सोलापूर या भागांमध्येही उन्हाचा कडाका जाणवतोय.
Heat Wave 10 एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार 10 एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट राज्यावर घोंगावतं आहे. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात जरी उष्णतेनं झाली असली तरी शेवट मात्र अवकाळीनं होण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतामध्ये बदलणाऱ्या प्रणालीमुळं या हवामानात अधिक बदल संभवतो. यामुळे शेतकरी वर्गाने हवामानाच्या सतत बदलणाऱ्या परिस्थितीची योग्य दखल घेणं आवश्यक ठरणार आहे.