14.8 C
New York

Sanjay Raut : उदय सामंत मौलवी आहेत की मुल्ला? वक्फच्या मुद्द्यावरून राऊतांचा खोचक सवाल

Published:

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर दोन दिवसांतच या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता लवकरच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. पण सत्ताधाऱ्यांनी वक्फच्या जमिनी बळकावण्यासाठीच हे दुरुस्ती विधेयक आणल्याचा आरोप सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राऊत हे मुसलमान समाजात गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याचे आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी केला. सामंत यांनी केलेल्या आरोपाला आता राऊतांनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. (Sanjay Raut scathing criticism of Uday Samant on the issue of Waqf)

वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक आणल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, या आरोपाला काही अर्थ नाही. उलट सर्वसामान्य मुस्लिम धर्मीयांनी या बिलाचे स्वागत केले आहे. ज्या लोकांना असे वाटते की आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते या बिलानंतर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत, त्या भीतीपोटी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेले आहे. पण आता सामंतांच्या या टीकेला राऊतांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हे जे उदय सामंत मुस्लिम धर्मीयांच्या गैरसमजाविषयी जे बोलत आहेत, ते मौलवी आहेत का? त्यांना मुस्लिम धर्म इतका माहीत आहे. इतकं प्रेम आहे त्यांना त्यांच्याबद्दल तर ते मौलवी आहेत की मुल्ला आहेत? कोणी कोणाविषयी गैरसमज पसरवत नाहीये. मुस्लिमांच्या संपत्तीचे व्यापारीकरण करण्यासाठी हे विधेयक आलेले आहे आणि हे त्यांना माहीत आहे. कारण त्यातील काही जमिनी भविष्यात सामंतांच्या घरात म्हणजेच मंत्र्यांच्या, कारण सामंत हे प्रतीक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे गेल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

तर, प्रत्येकाचे लक्ष हे वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि संपत्तीवर आहे. म्हणून या सगळ्यांनी या बिलाला पाठिंबा दिला आहे. हे तुम्हाला भविष्यामध्ये कळणार. आम्ही जमिनी विकू हे अमित शहांच्या भाषणात वारंवार आले आहे. ज्याला घटनेत अशा प्रकारे जमिनी विकण्याचा आधार नाही. जमिनी विकू असे शहा म्हणत आहेत, पण ते कोणाला जमिनी विकणार? त्या जमिनी कोण घेणार? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले. तर जो लेख ऑर्गनायझरने मागे घेतला असला तरी त्यांच्या जे पोटात होते, ते ओठावर आले आहे. मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर ख्रिश्चन, पारशी. देरासर, देवस्थानांच्या जमिनी अशा अनेक जमिनींवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे हे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत प्रत्येक धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी हे ताब्यात घेऊन त्यावर आपल्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देणार असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img