पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयावर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे हॉस्पिटल सध्या बरंच चर्चेत आलं आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्याच मुद्यावरून मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडलं असून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘यापुढे कोणत्याही रुग्णालकडून अनामत रक्कम ( डिपॉझिट) घेतली जाणार नाही’ , असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत झाला आहे.
दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला होता. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला. यामुळे प्रचंड खळबळ माजली आणि रुग्णालयावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. बघता बघता हे प्रकरण खूपच तापलं.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात समितीची घोषणा केली. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आलं. या प्रकरणात रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल समोर आला, त्यामध्ये अनेक खुलासे झाले.
Deenanath Mangeshkar Hospital रुग्णालयाकडून मोठा निर्णय
मात्र तरीही रुग्णालय प्रशासनावर बरीच टीका होत असून त्याच पार्श्वभूमीवर आता रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत एक ठराव झाला आहे. त्यानुसार यापुढे इमर्जन्सी असेल किंवा प्रसूतीसाठी असेल, कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला, तर यापुढे त्या रुग्णाकडून कोणतीही अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्या वेळापूर्वीच हा निर्णय रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जेव्हा दीनानाथ सुरू झालं तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतलं जात नसे, पण जसजसे उपचार आणि शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसतसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास डिपॉझिट घेण्यास कुठेतरी सुरूवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलीव्हरीच्या डिपार्टमेंटला आला असेल वा लहान मुलांच्या विभागात असेल त्यांच्याकडून इमर्जन्सी अनात रक्कम ( डिपॉझिट) घेणार नाही, असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे रुग्णालयातर्फे जाहीर करण्यात आलं आहे.